गोंदिया: लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज – जिलाधिकारी प्रजित नायर

518 Views

         गोंदिया, दि.12 : लोकसभा निवडणुकीचा बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकतो. त्यामुळे संपूर्ण जिल्हा प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आले आहे. गोंदिया जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची तयारी पूर्ण केली असून प्रत्येकाने आपापली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी प्रजित नायर यांनी दिल्या.

        आज जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व नोडल अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.तानाजी लोखंडे, उपविभागीय अधिकारी सत्यम गांधी, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहरे व सर्व नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते.

         या बैठकीत तिरोडा व अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील निवडणूक कार्याविषयी कामाचा आढावाही घेण्यात आला. निवडणूक कामाविषयी गठीत विविध समित्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी विषयानुसार नोडल अधिकाऱ्यांची दर मंगळवारी आढावा बैठक घेतात. निवडणुकीमध्ये आदर्श आचारसंहिता, कायदा सुव्यवस्था आणि माध्यमांचा गैरवापर याकडे विशेष लक्ष देण्यात यावे असे त्यांनी सांगितले. याबाबत कुठलीही हयगय सहन केली जाणार नाही, असे सक्त आदेश त्यांनी जिल्ह्यातील यंत्रणेला दिले.

        विविध विभाग व कक्ष प्रमुखांची यावेळी प्रामुख्याने बैठक घेण्यात आली. यामध्ये प्रशिक्षण व निर्धारित कर्तव्याची माहिती दिली गेली.

       निवडणुकी संदर्भातील समित्यांचे कर्तव्य, घ्यावयाची दक्षता, कार्यपद्धत, काल मर्यादा, अधिकार आणि व्याप्ती याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. विशेषतः आदर्श आचारसंहितेचा कुठेही भंग होता कामा नये, याबाबत सतर्क राहण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. निवडणूक काळामध्ये मोठ्या प्रमाणात अफवा पसरविण्याचे काम काही असामाजिक तत्वांकडून केले जाते. अनेक ठिकाणी निवडणूक यंत्रणा, ईव्हीएम मशीन, मतपत्रिका, कायदा सुव्यवस्था, यंत्रणाबद्दलची सुविधा या संदर्भात चुकीच्या बातम्या पसरविल्या जातात. समाज माध्यमांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो, मात्र असा चुकीचा प्रसार मोडून काढण्याच्या सूचना व असे करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश, त्या संदर्भातील तरतुदी याची माहिती यावेळी देण्यात आली.

       सायबर सेल दक्ष- जिल्ह्यातील सायबर सेल या संदर्भात अधिक दक्ष असून याबाबतीत तत्काळ प्रतिसाद देण्याची क्षमता प्रत्येक यंत्रणेने तयार करावी अशा सूचनाही यावेळी दिल्या. माध्यमातील वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, सोशल मीडिया या संदर्भात निवडणूक आयोगाने स्पष्ट निर्देश जारी केले आहेत. आचारसंहिता जारी झाल्यानंतर या संदर्भातील काटेकोर पालन करण्याबाबत सूचना प्रामुख्याने दिल्या.

          संविधानाच्या कलम 324 नुसार कोणत्याही कर्मचाऱ्यांची कुठेही सेवा अधिग्रहित करण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला आहेत. यंत्रणेतील अधिकारी हे निवडणूक आयोगाच्या वतीने काम करत असतात. त्यामुळे निवडणूक कामकाज अतिशय गांभीर्याने घेण्याचे त्यांनी सूचित केले. नियुक्तीनंतर निवडणूक कर्तव्यात बदल करण्यासाठी कोणी प्रयत्न करू नये, ड्युटी चार्ज बदलून मागू नये, अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी दिल्या. भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्यांनी सर्वोत्तम प्रयत्न निवडणूक प्रक्रियेत देणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

      विविध समित्यांचे गठन- लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात प्रशिक्षण व व्यवस्थापन समिती, आचारसंहिता कक्ष, कायदा व सुव्यवस्था, निवडणूकविषयक वेबसाईट तयार करणे, माहिती व व्यवस्थापन, निवडणूक निर्णय अधिकारी कक्ष, मतदान कर्मचारी व्यवस्थापन समिती, ईव्हीएम कक्ष, निवडणूक साहित्य स्वीकृती व वितरण कक्ष, मतपत्रिका कक्ष, मतदार यादी कक्ष, संगणक, सायबर सुरक्षा व माहिती तंत्रज्ञान कक्ष, वाहतूक व संपर्क व्यवस्था कक्ष, मतपत्रिका छपाई व वाटप कक्ष, सी-व्हीजील पब्लिक हेल्पलाइन, उमेदवार राजकीय पक्ष निवडणूक खर्च विभाग, मीडिया कक्ष (माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती), निवडणूक निरीक्षक कक्ष, मतमोजणी कक्ष, मतदार जनजागृती अभियान कक्ष, निवडणूक कायदेविषयक कक्ष, मतदान केंद्रावरील सुरक्षा व सुविधा कक्ष, अशा विविध समित्यांची व कक्षाची स्थापना जिल्हास्तरावर करण्यात आलेली आहे. या समित्यांमार्फत निवडणुकीचे कामकाज करण्यात येणार आहे. आजच्या बैठकीत समिती निहाय कामकाजाचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला.

Related posts