गोंदिया: पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्ह्यातील आठ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे उदघाटन

526 Views

         गोंदिया, दि.19 : ग्रामीण भागात स्वयंरोजगार निर्मितीला चालना देण्याच्या उद्देशाने परंपरागत चालत आलेल्या कौशल्यासमवेत नविन तंत्रकुशलतेची जोड देऊन ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्‍य विकास केंद्र’ राज्यातील 511 गावात सुरू होत आहेत. या महत्त्वाकांक्षी कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दृकश्राव्य प्रणालीद्वारे करण्यात आले. राज्यातील या 511 केंद्रापैकी गोंदिया जिल्ह्यातील 8 ग्रामपंचायतींच्या ठिकाणी हे केंद्र आजपासून सुरू झाले आहेत.

         प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दृकश्राव्य प्रणालीद्वारे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज महाराष्ट्रातील 511 ग्रामपंचायतींमध्ये प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र योजनेचा शुभारंभ झाला.

         ग्रामीण भागातून शहरी भागात रोजगारासाठी होणारे स्थलांतर कमी व्हावे हा उद्देश प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रामागे निश्चित करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील युवकांना त्यांच्या गावातच स्वयंरोजगाराच्या दृष्टीने पारंपारिक कौशल्यासह नवीन रोजगाराची क्षेत्र तपासून त्या अनुरूप त्यांना तंत्र कौशल्य मिळावे त्यासाठी या केंद्रात विविध प्रशिक्षण व कार्यानुभव दिला जाणार आहे.

        प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र ही संकल्पना राज्यातील तरुणांच्या रोजगार संधीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारी आहे. या केंद्रांमुळे ग्रामीण भागातील तरुणांच्या रोजगार संधी आणि त्यांना स्वावलंबी करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. यामुळे ग्रामीण भागातील अनेक तरुणांना कौशल्य आधारित शिक्षण घेणे, रोजगार मिळवणे आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे अधिक सोपे होणार आहे. तरुणांचा देश म्हणून आज भारताकडे बघितले जाते. हेच तरुण आपल्या आत्मनिर्भर भारताचा पाया आहेत. त्यामुळे आपल्या या युवाशक्तीला रोजगार विषयक कौशल्य आणि ज्ञान देवून भारताच्या समृध्द आर्थिक भविष्यासाठी सुसज्ज करण्यात येत आहे.

         गोंदिया तालुक्यातील शिवशंकर मंदिर ट्रस्ट, नागरा येथील कार्यक्रमाला आमदार विनोद अग्रवाल, अर्थ व बांधकाम सभापती संजय टेंभरे, समाज कल्याण सभापती सुषमा शेठ, जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, अपर तहसिलदार विशाल सोनवणे, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त राजु माटे, शासकीय आयटीआयचे प्राचार्य हेमंत आवारे, नागरा सरपंच टेकलाल नागपूरे, माजी आमदार गोपालदास अग्रवाल व हेमंत पटले, माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. जिल्ह्यातील उर्वरित सात तालुक्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

         कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापक जी.के.पारधी व कल्याणी डहारे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार नागरा येथील प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राच्या संचालिका प्रिती भांडारकर यांनी मानले. कार्यक्रमास शालेय विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related posts