गोंदिया: छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत तालुका स्तरीय समाधान शिबिर संपन्न

28 Views

 

गोंदिया। आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत तालुका स्तरीय समाधान शिबिराचे आयोजन टी.बी.टोली ग्राउंड, कुडवा, गोंदिया येथे मोठ्या उत्साहात पार पडले.


या शिबिराचे अध्यक्षस्थानी राज्याचे महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळेजी, तर प्रमुख अतिथी म्हणून खा. श्री प्रफुल पटेलजी उपस्थित होते. यावेळी आमदार विनोद अग्रवाल, माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाधिकारी प्रजित नायर तसेच अप्पर जिल्हाधिकारी मिनाज मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिबिरामध्ये तालुक्यातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. यामध्ये स्थायी पट्ट्यांचे वाटप, घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वितरण, ७/१२ अभिलेख दुरुस्ती, भूमिधारी वर्ग-२ चे वर्ग-१ मध्ये रूपांतर, संजय गांधी व श्रावण बाळ योजनेंतर्गत लाभ, निराधार नागरिकांना मदत, राशन कार्ड संबंधित कामे, स्वामित्व योजनेअंतर्गत पट्टे वाटप, मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदण रस्ते, वारस फेरफार प्रकरणे तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई यासारख्या विविध उपक्रमांचा समावेश होता.


या उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहिलेल्या नागरिकांचे प्रलंबित प्रश्न एकाच छताखाली निकाली काढण्यात आले. लाभार्थ्यांना थेट लाभ मिळावा आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख व्हावे, या उद्देशाने महाराजस्व अभियानांतर्गत हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरले.

Related posts